ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती कौतुकास्पद:  आर.एम.दिघे

दापोली: आदिवासी वाडीवरील प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेली डिजीटल क्रांती खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोना काळातही, डिजीटल साक्षरतेसाठी आदिवासी ग्रामस्थांनी केलेली मदत आणि शिक्षकांची मेहनत या दोन्ही गोष्टी वाखाणण्याजोग्या असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांनी केले. दापोली तालुक्यात कुडावळे भोईद-आदिवासीवाडी येथे जि.प.शाळेत डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याचे औचित्य साधून गटशिक्षणाधिकारी आण्णासाहेब बळवंतराव,विस्तार अधिकारी रामचंद्र सांगडे,केंद्रप्रमुख शितल गिम्हवणेकर यांचे प्रमुख उपस्थित गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांचे हस्ते सदर डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन करणेत आले.    

यावेळी उपस्थित देणगीदार व शिक्षकांचा गौरव दिघे यांनी केला. तर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवासात आणणार्‍या विविध शालेय उपक्रमांबाबत गटशिक्षण अधिकारी बळवंतराव यांनी आढावा घेत,शिक्षक व ग्रामस्थांच्या या नवोपक्रमाचे कौतुक केले.   ‘शाळेला गावाचा आधार असावा, आणि गावाला शाळेचा अभिमान असावा’ या दोन्ही गोष्टी तेव्हाच शक्य होतात,जेव्हा शाळा आणि समाज यांच्यात असणारे सामंजस्य उत्तम असते. अशा सामंजस्यामुळेच शाळेचा विकास आणि डिजिटल क्लासरुम निर्मिती यशस्वी झाल्याची माहिती माजी सरपंच महेश कदम यांनी दिली.

यावेळी सरपंच सरीता भुवड, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा विजया जाधव आदिवासी वाडी,व कलमकर वाडीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, आश्रयदाते,सुरेश कलमकर,प्रकाश पवार,सुरेश गोरीवले दिलीप खेडेकर शशिकांत पांढरे आदि.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक गजानन सामाले यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक नितेश मोतेवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी आदिवासीवाडी,भाईदवाडी तसेच शाळाव्यवस्थापन समिती आदिंनी विशेष प्रयत्न केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*