दापोली : तालुक्यातील कोंढे येथे वसतीला असलेल्या एसटी बसच्या टाकीतून सुमारे ५० लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दापोली-कोंढे ही एसटी बस कोंढे येथे रात्री ९.४० वाजता पोहोचली.

ही बस कोंढे येथेच रात्रीच्या वेळी थांबते. ५ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता बसचालक आशिष मळेकर यांच्या लक्षात आले की, बसच्या डिझेल टाकीचे कुलूप उघडे आहे.

तपासणी केल्यावर टाकीतून ५० लिटर डिझेल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या डिझेलची किंमत सुमारे साडेचार हजार रुपये आहे.

दापोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.