
रत्नागिरी : ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत (68th National Shooting Championship) कार्तिकी मानस देवळेकर आणि वरा मानस देवळेकर या बहिणींनी इतिहास घडवला आहे. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी कार्तिकीने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या भारतीय प्रख्यात नेमबाज (Renowned Shooter) होण्याचा मान पटकावला.
१६ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे झालेल्या या स्पर्धेत शॉटगन क्ले पिजन डबल ट्रॅप यूथ वुमन (Shotgun Clay Pigeon Double Trap Youth Women) श्रेणीत त्यांनी उत्कृष्ट नेमबाजी करून हा मान मिळवला. जिल्ह्यातील कोणत्याही महिला खेळाडूने यापूर्वी या श्रेणीत असा किताब पटकावला नव्हता, त्यामुळे हे यश विशेष महत्त्वाचे ठरले आहे.
याशिवाय, ११ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान भोपाळ, मध्य प्रदेश येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेतही या बहिणींनी कमाल दाखवली. ५० मीटर रायफल प्रोन युथ वुमन श्रेणीत वराने ५९४.२ गुण तर कार्तिकीने ५९९ गुण मिळवले. या कामगिरीमुळे दोघींनी २०२६च्या भारतीय संघ निवड चाचणीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
त्यांच्या या यशामागे प्रशिक्षक मोहनीश नंदकुमार हिरवे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच केसरी सिंग भाटी आणि जितेंद्र सिंग चौहान यांचेही विशेष सहकार्य लाभले.
कार्तिकी आणि वरा या रत्नागिरीतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असून सिध्दांत रायफल क्लबच्या सक्रिय सदस्य आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे त्यांचे ध्येय आहे.
क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव तथा राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज किशन खारके आणि नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी त्यांच्या यशाचे अभिनंदन केले असून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply