रत्नागिरी– राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करावे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा किंवा ग्रामपंचायतीमध्ये लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशा काही महत्वाच्या मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.

राज्य शासनाच्या वतीने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे योजिले आहे. लवकरच लसीकरण मोहीमेची सुरवात होईल. ही योजना उत्तम रीतीने राबविण्याकरिता, योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा, याच्या नियोजनाकरिता अभाविपने मागण्या केल्या आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने लसीकरणासाठी अभाविपच्या मागण्यांचा विचार करावा. ज्या कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सहकार्य लागेल, त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शासनाला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही अभाविप कोंकण प्रदेशमंत्री प्रेरणा पवार यांनी दिली.

अभाविपने म्हटले आहे की, महाविद्यालयांत लसीकरण सुरू झाल्यास सोशल डिस्टन्स पाळायला अडथळा होणार नाही. या मोहिमेत एमबीबीएस, बीएचएमएस आणि बीएएमएस उत्तीर्ण डॉक्टरांना आणि पॅरामेडिकल शिकणार्‍या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. वैद्यकीय मदतीच्या व्यतिरिक्त अन्य कामांसाठी एनएसएसएस, एनसीसी, अभाविप, अन्य सामाजिक संस्था संघटनांचा समावेश करून घेण्यात यावा. महाराष्ट्रात काही गावे मुख्य गावापासून खूप दूर आहेत. यासाठी काही विशेष योजना बनवून सर्व सुविधांनी सज्ज वाहनाद्वारे ही मोहीम पूर्ण करावी. घरकाम करणार्‍या महिला किंवा अनेक घरात जाणार्‍या कामगारांना प्राथमिकतेने लस द्यावी. एकूण लसीकरणाच्या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी. 60 वर्षांवरील नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा आठवड्याचे दिवस राखीव असावेत.