जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात- निलेश राणे

रत्नागिरी– कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आहेच. परंतु काही ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य यंत्रणेबाबत समस्या आहेत. त्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्या तात्काळ सोडवणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे निलेश राणे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाकडून पीआरओची स्वतंत्र नेमणूक केली जावी. रुग्णालयातील कंट्रोल रूममधून रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक ती माहिती योग्य प्रकारे दिली जात नाही. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ होत आहे. ही नेमणूक झाल्यास नातेवाईकांना योग्य माहिती मिळू शकेल.

अनेकदा रुग्णवाहिका वेळेत मिळत नाही आणि मिळाल्यास मोठ्या प्रमाणात शुल्क लावले जाते. त्यावर आपले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे नियंत्रण असायला हवे. याचबरोबर महिला रुग्णालयात आवश्यक त्या प्रमाणात पाण्याची सोय नाही. तसेच महिला रुग्णालयात वॉर्डबॉय, महिला शिपाईची पदांची संख्या वाढवून ती भरावीत. रुग्णालयात स्वच्छता राहण्याकरिता कचरा उचलण्यासाठी रोज गाडीची व्यवस्था करावी. रुग्णांना बेडची गरज असताना त्यांना प्रतीक्षेत ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत, यावर उपाययाेजना करण्याची मागणी राणे यांनी केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*