राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या एमएचटी-सीईटी 2022 साठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. सीईटी सेलकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे सीईटीच्या नोंदणीला आणि परीक्षेलाही उशीर झाला होता. त्यामुळे निकाल जाहीर होऊन प्रवेश प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला.

या पार्श्वभूमीवर सीईटीची नोंदणी प्रक्रिया थोडी लवकर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी जास्तीचा वेळ उपलब्ध होऊ शकेल. तसेच परीक्षाही लवकर झाल्यास कोलमडलेले शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर येऊ शकेल.