
दापोली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ चर्चा न करता कृतीची जोड दिली, तर काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण दापोली तालुक्यातील विरसई ग्रामपंचायतीने घालून दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत विरसईने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून ५० लाख रुपयांचे घवघवीत यश संपादन केले आहे.
लोकसहभाग आणि नियोजित आराखड्याच्या जोरावर विरसई आज संपूर्ण कोकण विभागासाठी पर्यावरण रक्षणाचा दीपस्तंभ ठरले आहे.
या यशाचा पाया विरसईने राबवलेल्या अत्यंत शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीच्या उपक्रमांवर आधारित आहे.
पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी योजना नसून ती एक जीवनशैली आहे, हे या गावाने सिद्ध केले आहे.
गावात झालेली वृक्षलागवड केवळ संख्येपुरती मर्यादित नसून, त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही ग्रामस्थांनी उचलली आहे.
वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करून विरसईने पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता स्पष्ट केली आहे.
पाणी हेच जीवन आहे, या उक्तीनुसार विरसईने जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वीपणे राबवली.
बंधारे बांधण्यासोबतच विरेश्वर विद्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात कार्यान्वित केलेली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली ही काळाची गरज असून, यामुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींमुळे गाव केवळ स्वच्छच झाले नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही सुरक्षित झाले आहे.
विरसई गावाचे हे यश म्हणजे केवळ प्रशासकीय कामगिरी नसून तो एका जनआंदोलनाचा विजय आहे.
सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्पक नियोजनाला विरसई जनसेवा मंडळ (मुंबई व ग्रामीण), महिला मंडळ, स्थानिक शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी तसेच मौजे खरवते येथील ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली.
सामूहिक जबाबदारीतून शाश्वत विकास साधता येतो, हे विरसईने राज्यासमोर अधोरेखित केले आहे. पारितोषिकाच्या ५० लाख रुपयांचा विनियोग आगामी काळात अधिक प्रभावी पर्यावरणपूरक कामांसाठी केला जाणार असल्याने, विरसईची ही ‘हरित वाटचाल’ अशीच अविरत सुरू राहणार आहे.

Leave a Reply