दापोली – सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दापोली अर्बन बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
बँकेने या वर्षात 7 कोटी 20 लाख रुपयांचा ढोबळ नफा आणि 3 कोटी 90 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी दिली.

31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या सांपत्तिक स्थितीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वर्षात बँकेच्या एकूण ठेवी 453 कोटी 89 लाख रुपये, तर कर्जवाटप 307 कोटी 52 लाख रुपये इतके झाले आहे.
यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय 750 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 13% असून, ढोबळ एन.पी.ए. 4% आणि निव्वळ एन.पी.ए. 0% राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.
बँकेच्या सर्व शाखा नफ्यात असून, सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे हे यश प्राप्त झाल्याचे डॉ. जालगांवकर यांनी सांगितले.
बँकेने आपल्या सभासद आणि ठेवीदारांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.
1000 रुपये आणि त्यावरील भाग धारण करणाऱ्या सभासदांसाठी 2 लाखांचा अपघात विमा आणि 50,000 रुपये व त्यापेक्षा जास्त ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांसाठी 5 लाखांचा अपघात विमा बँकेने स्वतःच्या उत्पन्नातून उतरवला आहे.
यासाठी बँकेने 46 लाख रुपये खर्च केले असून, या उपक्रमाचा अनेकांना लाभ झाला आहे.
आर्थिक वर्षात रतनजी टाटा यांच्या स्मृती जपण्यासाठी बँकेने 9% व्याजदराची ‘रतनजी टाटा मुदत ठेव योजना’ सुरू केली.

या योजनेला ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या 5 महिन्यांत 42 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
तसेच, विविध व्यावसायिकांना कमी व्याजदराने कर्ज देऊन त्यांच्या व्यवसायवृद्धीत बँकेने मोलाचे योगदान दिले आहे.
यामुळे कर्ज व्यवहारात 51 कोटी आणि एकूण व्यवसायात 75 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकेने निव्वळ नफ्याचे प्रमाण 0.75% राखले असून, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यात बँक यशस्वी झाली आहे.
“ग्राहकसेवा आणि विश्वासार्हता हे आमचे बलस्थान आहे. पुढील वर्षात ठेवींचा 500 कोटींचा टप्पा गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे डॉ. जालगांवकर यांनी सांगितले.