दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा- बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

दापोली :-दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.दापोली तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोलीकडे येतात. मुंबई व पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्याचा आर्थिक स्तर उंचावत आहे. पर्यटकांची संख्या व त्यांचे मुक्कामाचे दिवस वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासन पातळीवर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने विकास होणे आवश्यक आहे.

यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पां. वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही तीन भारतरत्ने तसेच लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रॅग्लर परांजपे, सरखेल कान्होजी आंग्रे या सर्वांचे दापोली तालुक्यात एकत्रित स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर दापोली कोकण कृषी विद्यापीठात मत्स्यालय उभारणे आवश्यक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे

दापोलीत जैवविविधता पार्कची गरज आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे उभारणे, तसेच शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर कायमस्वरूपी होलोग्रफिक अथवा लेझर शो करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*