दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन
दापोली : तालुक्यातील चक्रीवादळ प्रवण क्षेत्रातील विशेषतः समुद्र किनारपट्टी भागातील (दाभोळ ते केळशी) घरांना विशेष बाब म्हणून दीड ते दोन लाखापर्यंत विमा कवच देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार गट) करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दापोली तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोकणामध्ये मागील काही वर्षामध्ये सातत्याने चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. फयान, ओखी, तोक्ते व निसर्ग वादळामुळे दापोली तालुक्यातील बागायती लागवडीचे (आंबा, काजु, सुपारी, नारळ, केळी, मसाले पिके) झाडांचे खुप नुकसान झाले व येथील जंगलही उध्वस्त झाले.
त्याचबरोबर येथील घरांचे अपरिमित नुकसान झाले. शासनातर्फे घरांचे नुकसान भरपाईसाठी रु. १५०००/- ते रु. ४००००/- पर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली.
पण सदरची रक्कम ही खूपच तुटपुंजी होती. त्यामुळे येथील लोकांना खूपच अडचणींना सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली शासनाकडे मागणी करत आहोत की, तालुक्यातील चक्रीवादळ प्रवण क्षेत्रातील विशेषतः समुद्र किनारपट्टी गावातील (दाभोळ ते केळशी) घरांना दीड ते दोन लाखापर्यंत विमा कवच देण्यात यावे. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती आल्यास येथील रहिवाशांना आपल्या घराला विमा कवच असल्याने दिलासा मिळेल. प्रामुख्याने येथील घरे आणि घराखालील जमीन बिनशेती नसल्याने त्यांना खाजगी विमा कवच घेता येत नाहीये.
शासनाने या मागणीकडे लक्ष देऊन आपत्ती व्यवस्थापन निधीतून कोकणातील चक्रीवादळ प्रवण क्षेत्रातील घरांना दीड ते दोन लाखापर्यंत विमा कवच देण्यात यावं, असं तालुका अधयक्ष सचिन तोडणकर आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोकणातील भात, नाचणी, वरी, पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन अनुदान मिळावे
आपल्या दुसऱ्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं भात, नाचणी, वरी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली आहे.
यामध्ये म्हटलं आहे की, कोकणातील भात, नाचणी, वरी हे मुळे पिके असून दिवसेंदिवस वरील पिकांचे लागवडी क्षेत्र परवडत नसल्यामुळे व तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे कमी होत आहे.
येथील शेतक-यांची वरील त्रासामुळे वरील पिके घेण्याची मानसिकता नाही. त्यामुळे येथील शेतकरी शहरांकडे उद्योगधंद्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे येथील गावे ओस पडत आहेत. त्याचे दुरगामी परिणाम येथील भागांना होणार आहेत.
वरील पिकांची शेती झाली नाही तर जमिनीची मशागत होत नाही, जमिनीची उभी आडवी नांगरट होत नाही. त्यामुळे पावसाचे पाण्याचे जमिनीत मुरण्याचे प्रमाणे अत्यल्प होते व जमिनीत पाणी न मुरल्यामुळे उन्हाळयात पाण्याची टंचाई जाणवल्यामुळे त्याची झळ येथील लोकांना व पशुपक्षांनाही सोसावी लागते.
तरी येथील भात, नाचणी, वरी पिकांचे लागवडी क्षेत्र वाढविणेसाठी येथील शेतक-यांना वरील पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणेसाठी प्रोत्साहन अनुदान मिळावं अशी मागणीही राष्ट्रवादी कॉंग्रेस दापोलीकडून शासनाकडे करण्यात आली आहे.
या अनुदानामुळे येथील शेतकऱ्यांचं स्थलांतरित होण्याचं प्रमाणे कमी होवून शेतकरी लागवडीसाठी प्रवृत्त होतील, असं आपल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.
रेशनिंगमधून पुरवठा होणा-या फोटीफाईड तांदळाबद्दल जनजागृती करावी
आपल्या तिसऱ्या निवेदनात त्यांनी फोर्टीफाईड तांदळाबद्दृ सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, दापोली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, दापोली तालुक्यामध्ये सध्या रेशनिंगमधून पुरवठा होणारा तांदुळ हा कृत्रिमरित्या तांदळाच्या पावडरपासून (फोर्टीफाईड) बनवलेला तांदूळ वितरीत होत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये गैरसमज होत आहेत व त्यामुळे त्या तांदळाचा वापर न करण्याकडे कल आहे. तरी आपल्या कार्यालयातर्फे तालुक्यामध्ये नागरिकांसाठी जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना माहिती देऊन लोकांचा गैरसमज दूर करावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर, रविंद्र कालेकर, सौ.सुजाता तांबे, सुभाष पवार, ॲड.खलील डिमटीमकर, निजाम रखांगे, पूजा आग्रे, दत्ताराम जगदाळे, दिलीप कासारे आदी उपस्थित होते.