दापोली (जि. रत्नागिरी) : हर्णे-राजवाडी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत जयंत भागोजी दुबळे (वय ८०) या वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० ऑक्टोबर २०२५ रोजी घडली असून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद (अ.मू.र.नं. ७४/२०२५) करण्यात आली होती. मयताचे नातू कौशिक संजय दुबळे (वय २५) यांच्या खबरीवरून ही नोंद झाली. मात्र, प्राथमिक तपासादरम्यान प्रकरणाला मोठे वळण मिळाले.

पोलिसांनी मयताच्या घराची झडती घेताना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी हस्तगत केली. ही चिठ्ठी मयताच्या स्वहस्ताक्षरातील असल्याचे निष्पन्न झाले. चिठ्ठीत जयंत दुबळे यांनी जमीन व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहारामुळे जीवन संपवित असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यात संदेश शंकर कदम (वय ४८, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी, मूळ रा. हर्णे-राजवाडी) आणि अमोल भालचंद्र गुरव (वय ३९, रा. मोठी गोडी बाव, हर्णे, ता. दापोली) या दोघांची नावे उल्लेखिली आहेत. जमीन व्यवहारातून मिळालेली ४० लाख रुपये परत न मिळाल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.

चिठ्ठीच्या आधारे दापोली पोलिसांनी सखोल तपास करून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा रजि. नं. २०१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८ व ३(५) लावण्यात आले. हा गुन्हा १ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २.४१ वाजता नोंदवला गेला. त्यानुसार संदेश कदम व अमोल गुरव यांना तात्काळ अटक करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेने राजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.