नगराध्यक्ष पदाबाबतचा वाद अद्यापही कायम
दापोली : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार मी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्याकडे अद्यापही सोपवलेला नाहीये, अशी माहिती तत्कालीन नगराध्यक्ष ममता मोरे यांनी माय कोकणशी बोलताना दिली आहे.
आज, 15 मे 2025 रोजी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांना पदाचा कार्यभार सोपवण्याबाबतचे पत्र ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या हातात असे कोणतेही पत्र अद्याप आलेले नाही.
ममता मोरे सध्या दापोलीबाहेर असल्याने कार्यभार सोपवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या म्हणाल्या, “आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत जे निर्देश देतील, त्यानुसार मी निर्णय घेईन.” याशिवाय, 5 मे 2025 रोजी नगरपंचायतीत त्यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधात त्या उच्च न्यायालयात गेल्या आहेत. हा विषय सध्या प्रलंबित असल्याने पुढील निर्णयाबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांनी ममता मोरे यांना पाठवलेलं पत्र

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या सहीनं तत्कालीन नगराध्यक्ष ममता मोरे यांना आज दिनांक 15 मे 2025 रोजी ऑनलाईन पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या मधील मजकूर खालील प्रमाणे आहे,
दापोली नगरपंचायत, जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमान सदस्यांमार्फत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ब-५” (सुधारित राजपत्र दिनांक १५ एप्रिल, २०२५) अन्वये दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्षांस पदावरून दूर करणेबाबतचे मागणीपत्र दिनांक २५/०४/२०२५ रोजी प्राप्त झाले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने अधिनियमातील नमुद तरतुदीनुसार विशेष सभा दिनांक ०५/०५/२०२५ रोजी घेण्यात आली. प्राप्त इतिवृत्ताप्रमाणे विशेष सभेत दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षांस पदावरुन काढून टाकणेची मागणी करणारा ठराव १६ विरुध्द ०१ अशा एकुण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांच्या बहुमताने मंजूर करण्यात आला. सदर विशेष सभेत झालेल्या अविश्वास ठरावाने दापोली नगरपंचायतीचे अध्यक्ष पद रिक्त झाले आहे.
नगरपंचायत दापोली यांचे कार्यालयाकडील पत्र जा.क्र./दानपं/कावि/२७५/२०२५ दिनांक ०६/०५/२०२५ दापोली नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार अधिनियमातील तरतुदीनुसार उपाध्यक्ष दापोली नगरपंचायत यांचेकडे सोपवला नसल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे अधिनियमातील कलम ५७ मधील तरतुदीनुसार, श्रीम. ममता बिपीन मोरे तत्कालिन अध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांनी श्री. खालीद अब्दुल्ला रखांगे उपाध्यक्ष, दापोली नगरपंचायत यांच्याकडे दापोली नगरपंचायत अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवावा
– सही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदा बाबतचा वाद अद्यापही मिटलेला नाहीये, हेच यावरून स्पष्ट होत आहे.