दापोली: आरोग्य कर्मचाऱ्याचा ‘तो’ हल्ला म्हणजे वैयक्तिक वादाचा बनाव; संख्या कोळेकर यांचा पलटवार

दापोली | प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असली, तरी या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित कर्मचारी ड्युटी सोडून, कार्यक्षेत्राबाहेर येऊन वैयक्तिक कारणावरून वाद घालत असल्याचा खळबळजनक आरोप व्यावसायिक संख्या कोळेकर यांनी केला आहे. “आरोप करणे सोपे आहे, मात्र वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे आहे,” असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
संख्या कोळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याची ड्युटी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पिसई येथे होती. मात्र, ५:३० वाजताच ड्युटीचे कार्यक्षेत्र सोडून त्या १० किलोमीटर लांब कोळेकर यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी आल्या.

तिथे त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत वाद घातला. हा वाद एका अपघातासंदर्भात असून, पोलिसांनी तो मिटवावा अशी कोळेकर यांची मागणी होती.

कोळेकर यांनी प्रशासनासमोर खालील मुद्दे उपस्थित केले आहेत:

  • गणवेशाचा गैरवापर: शासकीय गणवेशात असताना वैयक्तिक भांडणासाठी दुसऱ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन दादागिरी करणे किती योग्य आहे?
  • अपघाताचा प्रयत्न: पोलीस स्टेशनला जात असताना संबंधित कर्मचाऱ्याने कोळेकर यांच्या गाडीला वेगाने धडक दिली. यात झटापट होऊन कपडेही फाटले.
  • कर्तव्यात कसूर: शासनाकडून भरघोस पगार मिळत असताना, रुग्णसेवा सोडून खासगी वादात वेळ घालवणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांमुळेच सामान्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत.

“शासकीय यंत्रणेचा पाठबळ वापरून स्वतःचा हलगर्जीपणा लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कर्तव्यावर असताना कार्यक्षेत्र सोडून खासगी वाद घालण्यासाठी शासन पगार देते का?” असा रोखठोक सवाल संख्या कोळेकर यांनी केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४ (पूर्वीचे ३५४), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३/५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी कोळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*