राजापूर तालुक्यातील डोंगर गावात जमावबंदी लागू

राजापूर : तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. वादानंतर गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये या करिता तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी १४४ कलमान्वये गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

१९ मार्च ते २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशान्वये डोंगर गावातील होळीचा मांड, श्री निनादेवी, डोंगरादेवी, ब्राम्हणदेव ही मंदिरे व त्या मंदिराच्या १०० मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पार्टी क्र. १ व त्यांचे हितसंबधित तसेच पार्टी क्र .२ व त्यांचे हितसंबधित यांना जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतच्या नोटिसा दोन्ही गटांना बजावण्यात आल्या आहेत. डोंगर येथे शिमगोत्सवावरून गेले काही वर्षे वाद सुरू आहेत. त्याबाबत न्यायालयात अधिकाराबाबत दावा दाखल झालेला आहे . या पार्श्वभूमीवर राजापूर तहसीलदारांनी यावर्षी डोंगर येथील शिमगोत्सव पार्टी क्र. २ म्हणजे गुरव गटाने रितीरिवाजाप्रमाणे साजरा करावा आणि पार्टी क्र. २ यांनी पार्टी क्र. १ शेलार गट व ग्रामस्थांना या सणामध्ये सामील करून घ्यावे, देवस्थानचे दास्तान, मुखवटे शिमगोत्सव साजरा करणेकामी पार्टी क्र.२ यांच्याकडे देण्यात यावेत, असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत वाद निर्माण होऊन त्यातून हाणामारी होऊन राजापूर पोलिसांनी उभय गटातील सुमारे ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रारंभी दिलेल्या आदेशाचे पालन उभय गटांकडून न झाल्याने वाद निर्माण झाल्याने आता नव्याने बंदी आदेश जारी करत शिमगोत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध केला तर गावात १४४ कलमान्वये बंदी आदेश जारी केला आहे. तहसीलदार जाधव यांनी पार्टीक्र. २ ला उत्सव साजरा करण्याची परवानगी देताना रितीरिवाज व प्रत्यक्ष कामकाज कशा पध्दतीने करावे याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले नसल्याने उभय गटात पालखी नेण्यावरून वाद निर्माण झाल्याचे शेलार गटाचे म्हणणे आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उभय गटातील संशयितांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*