दापोली : तालुक्यातील पन्हाळेकाझी येथील कोटजाई नदीवर म्हशींना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला चढवला. ही घटना रविवारी 12 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
पाण्यात असलेल्या तरुणाच्या मांडीला मगरीने चावा घेत तरुणाला जखमी केले. जखमी तरुणाला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्यावर 18 टाके पडलेले आहेत. एवढा मोठा चावा मगरीने घेतल्याने तरुण मृत्यूच्या जबड्यातून परत आल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिल जाधव हा तरुण कामावरून आल्यानंतर सायंकाळी म्हशीना धुण्यासाठी कोटजाई नदीत घेऊन गेला होता.
नदीत म्हशींना धुवत असताना पाठीमागून मगरीने त्याच्यावर हल्ला करत उजव्या मांडीला जोरदार चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्याने प्रणील पुरता घाबरला होता.
मगरीच्या जोरदार चाव्यामुळे तिचे दात खोलवर घुसले होते. त्याचबरोबर भळाभळा रक्त वाहू लागले. पाणी रक्ताने लाल झाले होते. प्रणीलच्या मित्राने या मगरीला दगड मारून हुसकावून लावले यामुळे प्राणिल यांचे प्राण वाचले.

जखमी अवस्थेत प्रणिल याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत १८ टाके घातले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मगरीने चावा घेतला.
या घटनेबाबत प्रणिलने प्रतिक्रिया देताना सांगितले की,
कंबरेपर्यंत पाण्यात उभा राहून म्हशीना धूत असताना एका 6 मीटर लांबीच्या मगरीने हल्ला केला, सुदैवाने मी तेव्हा प्रतिकार केल्याने मी वाचलो. अशा प्रकारे माणसांवर जवळपास 7-8 वेळा मगरीनी हल्ला चढवला असून आतापर्यंत कुत्रे, बकऱ्या यांच्यावरही हल्ले केले आहेत.
वन विभागाने वेळीच या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणीही प्रणिल याने केली आहे.
