बंदिस्त खेकडा पालन यशस्वी उद्योजकाकडे नेणारे – जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते


रत्नागिरी : बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण निश्चितपणे यशस्वी उद्योजकाकडे नेणारे आहे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्तेचे सार आहे. मिळालेल्या प्रशिक्षणावर आधारित यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सातत्याने त्यामध्ये सराव सुरु ठेवा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ) च्यावतीने 18 ते 20 ऑक्टोबर तीन दिवसीय बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे उपस्थित होत्या.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, पायात पाय घालून खाली ओढणारा म्हणून खेकडा हा बोली भाषेतील वाक्यप्रचारात बदनाम झाला आहे.

परंतु, हाच खेकडा पालन व्यवसाय तुम्हाला यशस्वी उद्योजकाकडे घेऊन जाणारा आहे. सामुहिकपणे खेकडा बीज बँक उभारणी करता येईल का ? यावर सर्वांनी जरुर विचार करावा. ही बँक अशा प्रकल्पांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल.

प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक तथा सहाय्यक संशोधन अधिकारी कल्पेश शिंदे यांनी प्रस्तावनेत प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.

संशोधन केंद्र प्रमुख वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांनीही विविध प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी सूत्रसंचालन केले. सहयोगी प्रा. डॉ. हरीष धमगाये यांनी आभार प्रदर्शन केले. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे, सिंधुदूर्ग, हिंगोली, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशिक्षार्थी सहभागी झाले होते.

Advertise

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*