मुंबई: राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून, शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असतानाही रूग्ण संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.८६ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज रोजी राज्यात एकूण ४,३०,५०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज २७ हजार ५०८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,२२,८२३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८३.८ टक्के एवढे झाले आहे.