भरडधान्याचा आहारात जास्तीत जास्त वापर करा – डॉ. प्रमोद सावंत

दापोली : जागतिक अन्न दिवस दिनांक १६ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि अंतर्गत येणारे कृषि महाविद्यालय, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला.

सन २०२३-२४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून विद्यापीठामध्ये साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून भरडधान्य पाककृती स्पर्धा विद्यापीठाच्या माहिती केंद्राशेजारील शैक्षणीक संग्रहालयात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या पाककृती स्पर्धेत भरडधान्यापासून विविध पौष्टीक मूल्यवर्धीत पाककृती तयार करण्यासाठी दापोली तालुक्यातील लाडघर, करजगांव, पंचनदी, कोळथरे, मौजे दापोली, चंद्रनगर, दाभोळ, सडवे, गिम्हवणे या गावांतून एकूण ३९ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

या स्पर्धकांनी एकूण विविध प्रकारच्या ५१ पाकृती सादर केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी संत्रा पौष्टीक केक, नाचणी सत्व झटपट केक, ज्वारीचा पुलाव, नाचणी सुरळीच्या वडया, नाचणीचा शिरा, वरीची खांडवी, मोदक, रागी उताप्पा, वरीची इडली, मिलट कुक्कीज, ज्वारीच्या चकल्या, पुलाव, पौष्टीक लाडू, नाचणी बर्फी, नाचणी चॉकलेट, नाचणी शिरा, नाचणी गुलाबजाम, नाचणी सूप, नाचणी डोसा, वरी बिस्कीट, कटोरी चाट, भरडधान्य कटलेट, मिलेटस् पुडींग, पौष्टीक लाडू, ज्वारीच्या चकल्या, पौष्टीक धोंडस इत्यादी नाविन्यपूर्ण पदार्थांचे सादरीकरण करण्यात आले.

या पदार्थांच्या पाककृतींचे परिक्षण करण्यासाठी रामराजे महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. कुणाल मंडलीक व प्राध्यापक श्री. अभिषेक इंदुलकर यांनी केले. यामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी वैभव कदम -ज्वारी संत्रा पौष्टीक केक, व्दितीय क्रमांक प्रियांका प्रभाकर कर्देकर-नाचणी सत्व झटपट केक, तृतीय क्रमांक प्रिती जैन- ज्वारीचा पुलाव यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ मिनल लिमये-नाचणी सुरळीच्या वडया आणि सिध्देश पाटील – नाचणीचा शिरा इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या पाककृती स्पर्धेच्या आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कृषि महाविद्यालय विस्तार शिक्षण विभागातील डॉ. संतोष वरखडेकर, डॉ. प्रविण झगडे, डॉ. मंदार पुरी, डॉ. संतोष मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

क्कत्याचबरोबर कृषि महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत दापोलीतील लाडघर, करजगांव, पंचनदी, कोळथरे, मौजेदापोली, चंद्रनगर या गावातील विद्यार्थीनी व थेट व्दितीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रविण झगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मंदार पुरी यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*