चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील – एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला मुद्देमालसह अटक करून गुन्हा दाखल केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
चिपळूण मधील वालोपे परिसरात एका तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.
मिळालेली माहिती सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पुढील नियोजन करून कार्यवाहिला सुरुवात केली होती. सबधितांला किंवा त्याच्या बरोबर रूम मध्ये राहणाऱ्या कोणताही सुगावा लागू नये याची पूर्ण काळजी घेत पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले.
आज दुपारी १२ वाजता रविंद्र शिंदे यांच्या बरोबर एपीआय साळोखे, संजय पाटील, पीएसआय अरुण जाधव, पंकज खोपडे, पूजा चव्हाण, हेडकॉस्टबेल, पाटील, शेटकर, दराडे, थेट वालोपे येथील माऊली अपार्टमेंटमध्ये दाखल झाले.
येथील एका रूममध्ये नीरज हा दरवाजाला आतून कडी लावून असल्याचे पोलिसांना समजताच रुमच्या बाहेर पूर्ण सापळा लावून तसेच सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले.
दरवाजा उघडताच पोलिसांनी नीरजवर झडप घातली. आणि रूम ची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती? आणि कशासाठी बाळगली होती. ?याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची शशक्यता आहे.