खेड :आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना बोरज येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील बोरज येथील घोसाळकर कुटूंबाला भेटून त्यांचे सांत्वन केले.
प्रकाश घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना घोसाळकर हे बोरज गावातल्या आपल्या मूळ घरी राहत होते. बोरजपासून जवळच असलेल्या लोटे येथे त्यांचे दोन मुलगे, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची नात खेळताना पडून जखमी झाली होती. या नातीला भेटायला हे आजी आजोबा दुचाकीवरून लोटे येथे गेले होते. लोटे येथून परतत असताना वाटेत ३३ केव्हीची विद्युत वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात न आल्याने त्यांचा नकळत या तारेला स्पर्श झाला आणि यामध्ये प्रकाश आणि वंदना या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेची दखल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यावेळी त्यांनी घोसाळकर कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी घोसाळकर कुटुंबीयांच्या वारसांना महावितरणमध्ये नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील स्पष्ट केले.
या दौऱ्यात त्यांच्यासह प्रविण दरेकर, विनय नातू हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी संपुर्ण घटनेची माहिती फडणवीसांकडून यांना दिली. तसेच यावेळी त्यांनी शासनाकडून तातडीची 1 लाखांची मदत करण्यात आली असून अन्य 4 लाखांची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार, ऊपविभागीय पोलीस अधिकारी, खेड पोलीस निरीक्षक, महावितरणचे अधिकारी भाजपाचे अनिकेत कानाडे, संजय बुटाला, रोहन राठोड हे उपस्थित होते.