दापोलीत डोळयांच्या साथीचा फैलाव कमालीचा वाढला आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक महिने डोळे तपासणी साठी कोणीही नेत्रतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. रुग्ण तपासणीसाठी जर उप जिल्हा रुग्णालयात तज्ञ वैदयकिय अधिकारीच उपलब्ध नसतील तर मग उप जिल्हा रूग्णालय हवेच कशाला ते बंदच करून टाका म्हणजे किमान येथे येण्याचा आमचा हेलपाटा तरी वाचेल अशाप्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया येथे आलेल्या रूग्णांकडून उमटत आहेत.
दापोली उपजिल्हा रूग्णालयात केवळ नेत्रतज्ज्ञच नव्हे तर जनरल सर्जन, एम.डी. मेडीसीन, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ, अस्थिरोग तज्ञ, दंतचिकित्सक आदी महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे दापोली उप जिल्हा रूग्णालय हे असून नसल्या सारखेच आहे. सध्या दापोली तालूक्यात सर्वत्र डोळ्यांची साथ पसरली आहे. त्यामुळे उपचारासाठी दापोली तालूक्यातील खेडेगावातून अनेक वृद्ध दापोलीत डोळे तपासणीसाठी चकरा मारीत असून नेत्ररोग सहाय्यक उपलब्ध नसल्याने मात्र आर्थिक नुकसान व शारीरिक नुकसानही होत आहे.
तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यादृष्टीने हेळसांड होवू नये म्हणून रिक्त पदे भरण्यात यावीत यासाठी तालूक्यातील पत्रकार हे 26 जानेवारीला उपोषणाला बसले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांतर पत्रकारांनी तुर्तास उपोषण स्थगित केले. संधी देवूनही काहीही सुधारणा नाही. त्यामुळे पुन्हा 15 ऑगस्टला उपोषणाचा मार्ग पत्करला मात्र परिस्थिती जैसे थेच आहे.
सरकार जाहीरातबाजीवर वारेमाप खर्च करत असले तरी सदयस्थिती काय आहे हे आता सरकारनेच डोळसपणे पाहणे गरजेच आहे. कारण जाहीरातबाजी हा केवळ आभास आहे. परिस्थिती मात्र वेगळीच आहे.
ग्रामीण रुग्णालयाची सेवा सारासार विचार करता वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा यांचा विचार करून शासनातर्फे दापोली ग्रामीण रुग्णालयाला इमारत नवीन बांधून उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देण्यात आला. उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात 2006 दरम्यान पार पडला. रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढली.
अधिकारी लोकांची भेट असल्यावर रुग्णालयात तयारी जय्यत ठेवली जाते. अधिकारी खुश होतात मात्र परत हा दिखाव्याचा साज काही तासात उतरतो व फक्त उपजिल्हा रुग्णालय हे नावच काहीही बदल न होता तसेच राहते. मात्र सेवेच्या दृष्टीने हे रुग्णालय काहीही उपयोगाचे नाही
नेत्र तपासणीसाठी यापूर्वी असणारे पिळणकर व गुळवे यांच्या निवृत्तीनंतर कोणीही डोळे तपासणीसाठी उपलब्ध नाहीत. एकंदरच उपजिल्हा नावाला साजेसे कोणतेही काम हे रुग्णालय करीत नसून अनेक पदेही रिक्त आहेत. या रुग्णालयाला विविध तज्ज्ञांची गरज असून डोळ्यांच्या साथीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली जात आहे.