रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस इथं आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव शनिवार दि. २१ रोजी सुरू होत आहे. यंदा २१ आणि २२ अशा दोन दिवसांमध्ये रसिकांना हा आनंद लुटता येणार आहे.
महोत्सवाचं उद्घाटन यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने होणार आहे. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून गेली १२ वर्ष त्या गायनाचे धडे घेत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. एन सी पी ए ची केसरबाई केरकर शिष्यवृत्तीच्याही त्या मानकरी आहेत. त्याचप्रमाणे पैंगणकर पुरस्कार, छात्र गंधर्व पुरस्कार, आदित्य बिर्ला फाउंडेशनचा कला किरण पुरस्कार, पुलोत्सव सन्मान अशा पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे.
या मैफिलीसाठी त्यांना प्रणव गुरव तबला साथ तर अथर्व कुलकर्णी संवादिनीसाथ करणार आहेत. फारुखाबाद घराण्याचे तबलावादक डॉ. अनीश प्रधान यांचे प्रणव हे शिष्य. बालपणी नाना मुळ्ये आणि नंतर सुरेश सामंत यांच्याकडे त्यांनी प्राथमिक धडे गिरवले आहेत. भारती विद्यापीठातून पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या डॉक्टरेटची तयारी करत आहेत. संवादिनी वादक अथर्व कुलकर्णी हे सुप्रसिद्ध वादक तन्मय देवचक्के यांचे शिष्य. भारती विद्यापीठातून संवादिनी विषयात एम ए. ही पदवी मिळवली आहे. उत्कृष्ट संवादिनीवादनासाठी त्यांना सीसीआरटीची शिष्यवृत्ती मिळाली आहे. यशस्वी यांना त्यांच्या सादरीकरणासाठी दोन कसलेल्या तरूण वादकांची समर्थ साथ लाभणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप गायन वादन नृत्य या कलांच्या संगमाने होणार आहे. पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तालचक्र महोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहे. विजय घाटे यांचा तबला, ताकाहिरो आराइ यांची संतूर, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे नृत्य आणि अभिषेक सिनकर यांची संवादिनी यांच्या एकत्रित परिणामाने तालचक्र रसिकांना गुंतवून ठेवतो. प्रत्येक मैफिलीचा तोल सांभाळण्याचे काम ताल करतो. अशा या तालांच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा तालचक्र हा एक अनोखा कार्यक्रम आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवसाची म्हणजे दि. 22 ची सुरूवात सुप्रसिद्ध सितार वादक मेहताब अली नियाझी करणार आहेत. सुप्रसिद्ध सितार वादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे मेहताब हे सुपुत्र. त्यामुळे वडिलांच्या तालमीत वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मेहताब यांनी सितारीशी दोस्ती केली. आजोबा उस्ताद वझीर अली काद्री हे सुप्रसिद्ध संवादिनी वादक. त्यांच्याकडून मेहताब यांनी भेंडीबाजार घराण्याची गायकीदेखील शिकून घेतली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी जाहीर कार्यक्रम करण्यास त्यांनी सुरूवात केली. आज ते भेंडी बाजार घराण्याचे अत्यंत आश्वासक वादक म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून भारताचे प्रतिनिधित्त्व देखील केले आहे. मेहताब यांना सितारवादनासाठी स्वप्निल भिसे यांची तबलासाथ लाभणार आहे. स्वप्निल यांनी प्रारंभिक प्रशिक्षण चंद्रकांत बोरसेकर यांच्याकडून घेतले. त्यानंतर प्रवीण करकरे आणि सध्या योगेश समसी यांच्याकडे पुढील धडे गिरवत आहे. आजवर अनेक महान कलाकारांना त्यांनी तबला संगत केली आहे. पं. डि.व्ही पलुस्कर पुरस्कार, पं. नंदन मेहता पुरस्कार, पं कांथे महाराज पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांप्रमाणेच भारत सरकारतर्फे दिली जाणारी स्वरतीर्थ सुधीर फडके शिष्यवृत्तीही त्यांना लाभली आहे.
२२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता या महोत्सवाचा समारोप करतील किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायक पं. व्यंकटेश कुमार. वयाच्या १५ व्या वर्षी गदगच्या वीरशैव संत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय कलाकार पुट्टराज गवई यांच्या वीरेश्वर पुण्याश्रमामध्ये दाखल झाले. तिथून पुढे १२ वर्ष आश्रमात राहून गायन तपश्चर्या केली. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याची गायकी आत्मसात केली. त्यांचे गुरू कर्नाटक शास्त्रीय संगीतात देखील प्रवीण असल्याने स्वाभाविकपणे पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनात देखील कर्नाटक संगीताची झाक दिसून येते. आश्रमातून बाहेर पडल्यावर जवळजवळ १५ वर्षांनी पं. भीमसेन जोशी यांनी त्यांना सवाई गंधर्व महोत्सवात गाण्यासाठी निमंत्रित केले. संगीत विषयावर त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा समावेश कर्नाटक शासनाच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले आहे. पद्मश्री पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
पंडितजींना संवादिनी साथ पं. अजय जोगळेकर तर तबला साथ भरत कामत करणार आहेत. मूळचे रत्नागिरीचे असलेले जोगळेकर संगीत महोत्सवाला बंधुत्वाच्या नात्याने जोडले गेले आहेत. ज्येष्ठ गुरू संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून मिळालेल्या विद्या आणि स्नेह या भांडवलावर आजपर्यंत पं. जोग़ळेकर यांची कारकीर्द बहरती राहीली आहे.
पं. कुमार यांना तबला साथ करणार आहेत, बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक भरत कामत. वडिल पंडित चंद्रकांत कामत आणि आजोबा पं. शांताराम कामत यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत. विविध महोत्सवातून अनेक दिग्गजाना त्यांनी आजवर तबलासाथ केली आहे. देशभरातल्या प्रतिष्ठेच्या संगीत समारोहांमध्ये त्यांनी तबलावादक म्हणून सन्माननीय उपस्थिती दर्शवली आहे.
रत्नागिरी शहराची शान असलेला थिबा राजवाडा या महोत्सवाच्या निमित्ताने सजवला जातो. रंगाकाम, प्रकाशयोजना, संपूर्ण आवारात रांगोळी अशी सजावट राजवाड्याच्या वैभवशाली देखणेपणात भर घालतात. आनंदाची बेगमी करून देणार्या या शास्त्रीय संगीत महोत्सवाला सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आर्ट सर्कल ने केले आहे.