दापोली : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ स्पर्धेत दापोली तालुक्यातील चिखलगाव ग्रुप ग्रामपंचायतीने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा, महिला सभा आणि ग्रामसभा आयोजित केली होती.

या सभांना मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावून स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली आणि प्रभावी अंमलबजावणीचा ठराव संमत केला.
ग्रामपंचायत अधिकारी अनंत कोळी यांनी अभियानाच्या कालावधीत करावयाच्या सर्व बाबींची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली.
दिनेश आडविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अभियानातील विविध घटकांवर चर्चा झाली. ग्रामपंचायत, महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक विभागांच्या उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा करून गुणांकन वाढवण्यासाठी त्रुटी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार केला.
या अभियानात स्थानिक बचत गट, सार्वजनिक गणेश मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ आणि इतर संस्थांना सहभागी करून घेण्याचे ठरले.

या कार्यक्रमाला उपसरपंच जयंत जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक केदार सरस्वते, ग्राममहसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, लोकमान्य हायस्कूलचे अध्यक्ष कैवल्य दांडेकर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामसंघ अध्यक्ष, सी.आर.पी. बचत गट सभासद, युवक मंडळांचे अध्यक्ष/सचिव, तसेच सरकारी आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी आणि संस्थांनी सक्रिय सहभागाची तयारी दर्शवली असून, अभियानाच्या यशासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.