महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने ६१ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

आजपासून राज्यात १८ ते ४५ वर्षांमधील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. काही मोजक्या लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सर्व वीरांना विनम्र अभिवादन केले. राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षीही महाराष्ट्र दिन कोरोनाच्या सावटात गेला. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आपल्या मागे दृष्टचक्र लागले आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. राज्यातील लोकांनी समजूतदारपणा दाखवल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन करावा लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*