दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध कवी चेतन राणे यांच्या फेसबुक या गाजलेल्या कवितेचा समावेश ‘काव्यसुगंध’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात करण्यात आला आहे.
पुण्याच्या ‘स्नेहवर्धन प्रकाशन’ या संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. चेतन राणे हे शिक्षक असून ‘फेसबुक’ ही त्यांची उपरोधिक कविता आहे. काव्यवाचनाच्या कार्यक्रमात ही कविता हमखास प्रतिसाद मिळवत आली आहे.
‘काव्यसुगंध’ या राज्यस्तरीय प्रातिनिधीक संग्रहाचे संपादन प्रा. हनुमंत माने यांनी केले आहे. सध्याच्या ‘सोशल मीडियाच्या’ व्यसनात गुंतलेल्या पिढीसाठी ‘फेसबुक’ ही कविताही खूप छान आहे, असा अभिप्राय या पुस्तकाच्या अतिथी संपादिका स्वाती पाटणकर यांनीही त्यांच्या संपादकीय मनोगतात दिला आहे.
‘प्रोफाइल फ्रेंड्स मेसेजमध्ये
तरुण हात गुंतले आहेत
अन् चॅटिंग कमेंट लाईकमध्ये
विचार सारे खुंटले आहेत’
हे आजचे सामाजिक वास्तव अगदी मोजक्या शब्दात चेतन राणे या कवितेतून मांडतात. त्यामुळे ‘फेसबुक’ ही कविता मजेदार असूनही तितकीच मर्मभेदक ठरली आहे.
या नवीन यशाबद्दल चेतन राणे यांचे स्थानिक साहित्य वर्तुळात कौतुक व अभिनंदन होत आहे.