चंद्रनगरची श्रुती मिसाळ जिल्हा स्तरावर झळकली; वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गौरव

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी श्रुती सचिन मिसाळ हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तिचा विशेष गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत दापोली-खेड-मंडणगड विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतीने आपल्या प्रभावी वाणीने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला होता.

२७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित भव्य समारंभात श्रुतीला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

लहान वयातच श्रुतीने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*