नवी दिल्ली: दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.