बागवेवाडी येथे अखेर BSNL टॉवर सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर: तालुक्यातील बागवेवाडी (Bagvewadi) आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मौजे बागवेवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा मोबाईल टॉवर अखेर सुरू झाला आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून नेटवर्कच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेटवर्कसाठी चाललेला संघर्ष संपला
बागवेवाडी या गावाला मोबाईल नेटवर्कसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत होता. हा टॉवर सुरू झाल्यामुळे आता बागवेवाडीने विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना महत्त्वाच्या
या कामात विद्यमान आमदार मा.श्री. किरणजी सामंत आणि जिल्हाधिकारी मा.श्री. देवेंदरजी सिंह यांनी विशेष लक्ष घातले. त्यांनी तालुक्यातील मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते.
ग्रामस्थांनी केला पाठपुरावा
या निर्देशानंतर गावातील ‘बालमित्र मंडळाचे’ अध्यक्ष श्री. कमलेश गांगण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तत्काळ मा.श्री. किरण सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि राजापूर येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीनुसार, तातडीने सर्वेक्षणाचे काम सुरू झाले.
सरपंच आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे सहकार्य
या प्रक्रियेत सरपंच कु. नीलमताई हातणकर यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वेळेवर राजापूर कार्यालयात जमा करून स्थानिक ग्रामस्थांशी समन्वय साधला.
या संपूर्ण कामात श्री. प्रशांत कुलकर्णी (BSNL अधिकारी), सौ. अदिती नार्वेकर मॅडम (भू कर मापक अधिकारी), श्री. रसाळ सर (BSNL अधिकारी, रत्नागिरी डिव्हिजन) आणि श्री. शिरसाट सर (रत्नागिरी डिव्हिजन) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, बागवेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला.
गावकऱ्यांचे सामूहिक प्रयत्न
उपसरपंच श्री. शिवरामजी कामतेकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष शेट्ये, सचिव श्री. विजय पांचाळ, श्री. दशरथ कामतेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. तनुजा बावकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय रोडे यांच्यासह श्री. योगेश हातणकर, श्री. संतोष कामतेकर, श्री. संभाजी कुळये, माजी ग्रा.पं. सदस्य श्री. अनंत बावकर आदींसह अनेक स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य केले.
जमीन मालकांचे योगदान
सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी लगतचे जमीन मालक श्री. रोहन मसुरकर, श्री. संतोष आगटे आणि श्री. प्रवीण कामतेकर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हा टॉवर सुरू झाल्याबद्दल आमदार श्री. किरणजी सामंत, सर्व अधिकारी वर्ग, मुंबईस्थित आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे यावेळी आभार मानण्यात आले. या टॉवरमुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी दळणवळण करणे अधिक सुलभ होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*