रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भव’ या मोहिमेचा एक भाग म्हणून समाजात रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसारविणे आणि स्वेच्छेने रक्तदान घडवून आणणे या उद्देशाने आणि रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितिच्या सहभागाने 04 ऑक्टोबर 2023 रोजी रत्नागिरी विमानतळ येथे रक्तदान शिबिर राबविण्यात आले करण्यात आले.

देशातील प्रत्येक शहरात आणि खेड्यात सर्वव्यापी आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने राबवण्यात येणार्‍या ‘आयुष्मान भव’ या मोहिमेच्या प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीद्वारे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या मदतीने आणि तटरक्षक दलाचे जवान, त्यांचे कुटुंबिय, रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितिच्या सदस्य संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या रक्तदात्यांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रुजीत सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या समाजात अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमात उपस्थित समुदायातर्फे अवयवदानाची शपथ देखील घेण्यात आली.

यावेळी सर्व उपस्थितांची रक्तगट तपासणी करण्यात आली आणि एकूण 29 युनिट रक्त जमा करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सर्जन लेफ्टनंट कमांडर संगमेश, सर्जन लेफ्टनंट गोपन जीजे, चंद्रकांत कुमार आणि नराकासचे सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी केले.

भारतीय तटरक्षक अवस्थान आणि तटरक्षक वायु अवस्थान यांच्या व्यतिरिक्त रत्नागिरी नगर राजभाषा समन्वय समितिच्या सदस्य संस्थांपैकी भारतीय स्टेट बँक, भारतीय जीवन विमा, इंडियन बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, सीमा शुल्क विभाग, आयकर विभाग यांच्या कर्मचार्‍यांनी या रक्तदान शिबिरात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला. या उपक्रमाची जिल्हा रुग्णालय व उपस्थितांतर्फे प्रशंसा करण्यात आली.

या उदात्त कार्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आणि शिबीर सुनियोजितपणे पार पाडल्याबद्दल तटरक्षक दलातर्फे रक्तपेढीचे प्रभारी डॉ. अर्जुन सुतार, मुख्य परिचारिका जयश्री मॅथ्यू तसेच त्यांच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यात आले.

भारतीय तटरक्षक दल हे आपली सागराची आणि किनारी भागांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या जबाबदारी बरोबरच नागरिकांप्रती आपली बांधिलकी दृढ करणारे विविध समाजोपयोगी आणि सर्वसमावेशक उपक्रम नेहमीच राबवत असतो.

केंद्र शासनाची एक सशस्त्र सेना म्हणून म्हणून भारतीय तटरक्षक दल आपल्या नागरिकांबरोबर संवाद साधण्याची आणि त्यांच्यांत जागरूकता पसरवण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

यासाठी तटरक्षक दलातर्फे वेळोवेळी मच्छिमार बांधवांबरोबर समुदाय संवाद कार्यक्रम, शाळा – महाविद्यालयांमद्धे जागरूकता उपक्रम, समुद्र संरक्षणात भागीदार संस्थांच्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन उपक्रम, स्वच्छता मोहिमा इत्यादि वेळोवेळी हाती घेत असतो.

याचाच एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीतर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.