गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील ‘या’ 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, काळजीवाहू मुख्यमंत्री करणार काय?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.
विधानसभेच्या निकालानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला
भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप आणि शिद गटात धुसफूस ?
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांना मंत्रिपद न देणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. तानाजी सावंत यांचा कुठल्याही परिस्थितीत मंत्रीमंडळात समावेश झाला पाहिजे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दुसरीकडे भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून त्यांना मंत्रिपद द्यावे लागले तर दीपक केसरकर यांना थांबावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे कोकणातील दोघे मंत्री असताना गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास ही संख्या तीन होणार आहे. त्यामुळे आता या चार नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरूनही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होऊ शकते.
आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर या नेत्यांचे भविष्य अवलंबून आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात अद्याप समाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे सरकार स्थापना लांबणीवर पडत आहे. काल महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार होती. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या गावी निघून गेल्याने कालची बैठक रद्द करण्यात आली. पुढील दोन दिवस महायुतीची बैठक होणार नसून भाजपच्या गटनेत्याची निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटातील चार नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला विरोध दर्शवल्याने वाटाघाटीचा तिढा वाढत असल्याचे दिसून येत आहे.