गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरुन अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत असून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीदेखील शोक व्यक्त केला असून बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात असल्याची भावना व्यक्त केली आहे.
“लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे,” असं रश्मी ठाकरे म्हणाल्या आहेत.
बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत,” असं सांगत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.