दापोली नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन जाधव शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सचिन जाधव हे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यासाठी गेले आहेत अशी माहिती सुद्धा पुढे आली होती. नक्की त्यांनी राजीनामा दिला आहे की नाही, हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी ते शिवसेनेमध्ये जात आहेत हे जवळजवळ निश्चित आहे.

गेल्या तीन टर्मपासून ते दापोली नगरपंचायत मध्ये नगरसेवक आहेत. दापोली शहरातील कोकण कृषी विद्यापीठाच्या वसाहत परीसरामध्ये त्यांचं काम राहिले आहेत. सचिन जाधव हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.