दापोली – तालुक्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण २२८२ विद्यार्थी बसले असून दि. १५ मार्च पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सुरुवात झाली आहे. दापोली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी दापोली येथील ए. जी. हायस्कूल येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दापोली तालुक्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या अंमलबजावणीचे संपूर्ण नियोजन झाले असून दापोली तालुक्यात या परिक्षेसाठी मुख्य केंद्रे ८ असून उपकेंद्रे ३२ आहेत.
यावर्षी बोर्डाच्या निर्णयानुसार प्रत्येक शाळास्तरावर परीक्षा केंद्र उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. मात्र तरीही आवश्यक ती गोपनियता व गांभीर्य लक्षात घेऊन भयमुक्त वातावरणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पार पाडाव्यात अशा सूचनाही गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी संबंधितांना दिल्या.
दापोली तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा अतिशय सुरक्षित वातावरणात सुरु असून सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या परिक्षेत उज्वल यश संपादन करावे अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.