
लांजा: तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण (भैया) सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या बंदिस्त नलिका प्रणालीसाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे बेर्डेवाडी कालव्याला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली आहे.
बेर्डेवाडी प्रकल्पाचे काम २०२३ मध्ये पूर्ण झाले असले तरी, कालवा अस्तरीकरण विरहीत असल्याने पाणी शेवटपर्यंत पोहोचत नव्हते.
तसेच पाणी झिरपून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन भैया सामंत यांनी या कालव्याचे काम बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे (Piped Distribution Network) करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आता ० ते ६ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याचे काम बंदिस्त पद्धतीने होणार आहे.
यामुळे ५२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. याशिवाय, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठीही भैया सामंत यांनी पुढाकार घेतला असून, केंद्रीय जल ऊर्जा संशोधन केंद्र (CWPRS) पुणे यांचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाला आहे.
गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली काढल्याबद्दल वेरवली ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply