पंचनामा करण्यास कुणीही नव्हते; गरीब आपदग्रस्त डेरवणला दाखल

खेड : तालुक्यातील बहिरवली नंबर २ मधील गरीब शेतकरी अश्रफ अहमद चौगुले यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथे झाली असताना सकाळी ९ वाजताच्या सुमारास गावातील घर वीजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे.

ही घटना सकाळी दहाच्या सुमारास ग्रामस्थ यांच्या लक्षात आली.

बहिरवली नंबर २ मधील गरीब गावकरी अश्रफ अहमद चौगुले यांना हृदयविकार त्रास जाणवत होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मात्र शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने त्यांना डेरवण, ता. चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मंगळवारी, त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी असे दोन्ही माणस त्यांच्या सोबत होती.

याचवेळी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. वीजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी मदतकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याशिवाय नगर परिषदेचा अग्निशमन दलाचे पथक सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते.

मात्र त्यापूर्वीच संपूर्ण घर जळून खाक झाले होते. घर आणि घरामधील साहित्य जळून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान आगीत झाले आहे.

एकीकडे हृदयविकार शस्त्रक्रिया तर दुसरीकडे घर जळाल्याने दुहेरी संकटात अश्रफ अहमद चौगुले हे सापडले आहेत.

घर जळाल्याने गावातील ग्रामस्थांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला.

मात्र दोघेही गावात नव्हते. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नाही, असे गावकरी यांनी सांगितले.