दापोली : केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसुचनेद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असून, दापोली तालुक्यासाठी प्रख्यात साहित्यिक आणि जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांची दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यांच्या सोबत एन के वराडकर कॉलेजचे शिक्षक दीपक गडकर यांचीही मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
बाबू घाडीगांवकर हे कोकणातील सुप्रसिद्ध साहित्यिक असून, गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य आणि लेखन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचा कोकणातील ग्रामीण लोकजीवन हा लेखनाचा मुख्य विषय आहे.
त्यांनी कथा, कविता आणि ललितलेखनातून कोकणच्या संस्कृतीला आणि जीवनशैलीला शब्दरूप दिले आहे. त्यांच्या तीन हजारहून अधिक साहित्यकृती विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांचा ‘बाबा’ हा कवितासंग्रह आणि ‘वणवा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून, आणखी काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच यांसारख्या साहित्यिक संस्थांमधून कार्यरत असताना, बाबू घाडीगांवकर यांनी शेकडो नवोदित लेखकांना लेखनाकडे वळण्यास प्रेरित केले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लेखकांनी साहित्य क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना साहित्यविश्वात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
बाबू घाडीगांवकर यांची दापोली तालुका मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.