रत्नागिरी : कोव्हिड काळात काम करूनही शासन स्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानधन थकवण्यात आले असून त्यांचे भत्तेही दिलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे शंकर पुजारी, पल्लवी पालकर, रुचिता सावंत, दिव्या शिबे, कामिनी पडवळकर आदी उपस्थित होते. निवेदनानुसार, आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. तिसर्या लाटेत आशा व गटप्रवर्तकांच्या कष्टावरच आरोग्य विभाग टिकून राहिला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यांचे मानधन थकीत आहे. केंद्र शासनाच्या सुधारित पत्रानुसार ऑक्टोबर 2021 पासून कोव्हिड प्रोत्साहन भत्ता आशा स्वंयसेविकांना 1 हजार रुपये, गट प्रवर्तकांना 500 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. चार महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता त्वरित देण्यात यावा आणि यापुढे दरमहा नियमितपणे कोव्हिड प्रोत्साहन भत्ता मिळावा. तो थकबाकीसह तत्काळ मिळावा. 17 जुलै 2020 च्या शासन निर्णयानुसार राज्य निधीमधून मोबदल्यात वाढ केली आहे. तो मोबदला सप्टेंबर 2021 पासून देण्यात आलेला नाही. मोबदल्यात दरमहा 500 रुपये वाढ करण्याचे ठरत आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत जेथे सीएचओची नेमणूक केलेली नाही, तेथे आशांना काम करण्यास सक्तीने भाग पाडले जाते. सीएचओची नेमणूक नसल्याने आशांना काम करुनही कामाचा मोबदला दिला जात नाही, असे निवेदनात म्हटले आहे.