मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक सवाल केला आहे. ‘अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?’ अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.