रत्नागिरी: जागतिक महिला दिन २०२५ निमित्त ‘आस्था’ संस्थेच्या ‘सुपर मॉम’ पुरस्काराने अनिता आत्माराम नारकर यांना गौरविण्यात आले.
अनिता नारकर यांचा जन्म गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मुंबई महानगरपालिकेत १९७८ ते २०१४ या काळात त्यांनी सेवा बजावली.
त्यांना दोन आपत्ये आहेत. त्यांची मुलगी आरती ही ४६ वर्षांची असून, ती बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग आहे. घरातील कामे ती आवडीने करते. मॅरेथॉन स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
समाजसेवेची आवड आणि मुलीचे अपंगत्व यामुळे अनिता नारकर यांनी सेवानिवृत्तीनंतर २०१८ मध्ये चिपळूण तालुक्यातील पेढे येथे ‘आरती निराधार सेवा फाउंडेशन’ संस्थेची स्थापना केली.
आता मालघर येथेही संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली आहे.
गेल्या सहा-सात वर्षांत संस्थेने ४७ वृद्ध, दिव्यांग, निराधार आणि पीडित महिलांना आधार दिला आहे.
आपली मुलगी आणि इतर दिव्यांग व वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या अनिता आत्माराम नारकर यांना ‘आस्था सोशल फाउंडेशन’च्या वतीने सम्राज्ञी संजय चाळके यांच्या हस्ते ‘सुपर मॉम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ५,००० रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमात सुरेखा पाथरे यांनी अनिता नारकर यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
अनिता नारकर, आत्माराम नारकर, आरती नारकर, अनघा जैतपाळ यांच्यासह ‘आस्था’चे पालक आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.