दापोली: दापोली नगरपंचायत हद्दीतील जोग नदीत सांडपाणी आणि कचरा टाकण्याच्या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने मौजे दापोली येथील रहिवाशी रुद्रराज (अल्पेश) अरुण भुवाड यांनी पुन्हा महाराष्ट्र दिनी उपोषण केलं. गेल्या वर्षी २६ जानेवारी २०२४ रोजी त्यांनी याच मुद्द्यावर तहसील कार्यालयाबाहेर त्यांनी उपोषण केले होते. तेव्हा नगरपंचायतीने सांडपाणी आणि कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने भुवाड यांनी १ मे २०२५, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून पुन्हा उपोषण केलं.

भुवाड यांनी दापोली नगरपंचायतीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नदीत सोडले जाणारे सांडपाणी आणि कचरा यामुळे हर्णे, पाजपंढरीसह नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः पाजपंढरी गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर अवलंबून आहेत. दूषित पाण्यामुळे या भागात आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

याशिवाय, दापोली शहरातील काही नागरिक सकाळच्या फिरण्याच्या बहाण्याने गावातील रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दापोली नगरपंचायतींना अल्पेश भुवड यांना या वेळेला आश्वस्त केलं आहे की, या वेळेला या समस्येवर आम्ही नक्कीच उपाय योजना करू आणि या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू.

आता नगरपालिका यावर काय उपाययोजना करतं आणि केव्हा करतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे