आंतरराष्ट्रीय पंच अल्लाहुद्दीन पालेकर यांनाही वडापावची ओढ!

रत्नागिरी (मुश्ताक खान) –

दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघा मधील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरुवात झाली. या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचे पंच अल्लाहुद्दीन पालेकर यांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केले.

अल्लाउद्दीन पालेकर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या शिव बुद्रुक या गावचे आहेत. त्यांचे आजोबा दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले आणि त्यांच्या पुढच्या पिढीने आफ्रिकेत नागरिकत्व स्वीकारले पण त्यांची नाळ भारताशी आजही जोडलेली आहे.

त्यांचे काका जमालुद्दिन अहमद पालेकर यांचं घर आजही शिव गावात आहे अल्लाहुद्दीन पालेकर स्वतः देखील खेड मधल्या मुळ गावी आपल्या गावी अधून मधून येत असतात. इथलं वातावरण, इथली माणसं त्यांना प्रचंड आवडतात. दोन वर्षांपूर्वी आपल्या एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात ते सहभागी झाले होते.

शिव गवातील अल्लाहुद्दीन यांच्या काकांचं घर

त्यांचा जन्म 1 जानेवारी १९७८ रोजी केपटाउन, दक्षिण अफ्रिका येथे झाला. ४४ वर्षीय पालेकर सुमारे अठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली वानखेडे स्टेडियम बघण्यास आले असता त्यांना सुरक्षारक्षकाने आतमध्ये जाण्यास मनाई केली होती. त्याच मैदानावर त्यांनी २०१५ मध्ये झालेल्या मुंबई- मध्य प्रदेश या रणजी सामन्यात पंच म्हणून काम बघितले.

पालेकर यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पणही भारताविरुद्धच २०१८ मध्ये केलं होतं. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असताना, टी२० सामन्यात पंच म्हणून काम पाहताना त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

मित्रांसोबत अल्लाहुद्दीन पालेकर

त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला अचूकरित्या बाद दिलं होतं. त्याच वर्षी त्यांना आंतरराष्ट्रीय पंच म्हणून मान्यता मिळालेली.

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावणारे ते ५७ वे पंच आहेत. त्याचवेळी, अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ४९७ वे पंच ठरले आहेत.

अल्लाहुद्दीन पालेकर यांना काय आवडतं

प्रत्येक कोकणी माणसाप्रमाणे अल्लाहुद्दीन यांना देखील वडापावचं प्रचंड वेड आहे. भारतामध्ये आले आणि वडापाव नाही खाल्ला असं होतं नाही. त्यांना ट्रेनमधून प्रवास करणं देखील प्रचंड आवडतं. खेडमध्ये कधी आले तर खासगी गाडीने न येता ते ट्रेनमधून प्रवास करणं पसंत करतात. अस्सल कोकणी माणसाप्रमाणे वावरायला त्यांना आवडतं. घरी असताना लुंगीचा वापर करायला ते विशेष पसंती देतात. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील ही माहिती आम्हाला त्यांचे चुलत बंधू बख्तियार पालेकर यांनी दिली आहे.

आपल्या मित्रांसोबत अल्लाहुद्दीन खेड रेल्वे स्टेशनवर

त्यांचं संपूर्ण घराणं क्रिकेटशी संबंधित आहे. त्यांचे वडील देखील पंच होते. त्यांचे बंधूही क्रिकेटशी संबंधित आहेत. बख्तियार पालेकर तर युएईच्या राष्ट्रीय संघात खेळले आहेत.  उत्कृष्ट फलंदाज म्हणून ते परिचित होते. अल्लाहुद्दीन यांचं करिअर देखील क्रिकेट मधूनच बहरत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाला माय कोकणच्या शुभेच्छा!

चुलत बंधु बख्तियार पालेकर यांच्या मुलांसोबत अल्लाहुद्दीन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*