मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे उद्या कार्यान्वित होणार

मुंबईत कोविशिल्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले असल्याचं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं. उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र कोवॅक्सिन ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसऱा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्याचा साठा मर्यादित असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मुंबईत ७ खासगी रुग्णालये, ३० सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रे अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु असल्याची माहिती दिली. त्यांनी पुढे लोकांना आधी चौकशी करुन मगच लस घेण्यासाठी जाण्याचं आवाहनही केलं आहे. लसींचा साठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने त्यांनी हे आवाहन केलं आहे. आधी चौकशी करुन लसीकरण केंद्रावर गेल्यास त्यांची केंद्रावर जाऊन होणारी धावपण टाळता येईल असंही त्या म्हणाल्या.

मुंबईत या रुग्णालयांत सुरू आहे लसीकरण!

यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत लसीकरण सुरू असलेल्या खासगी आणि सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालय आणि केंद्रांची यादीच सादर केली. यात मुंबईतील मित्तल रुग्णालय, क्रिटिकेअर रुग्णालय, तुंगा रुग्णालय, लाईफलाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, शिवम रुग्णालय, कोहिनूर रुग्णालय, एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून जेजे रुग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, एसएआयएस रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, भाभा रुग्णालय, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, कूपर रुग्णालय, टोपीवाला रुग्णालय, गोकुळधाम प्रसुतीगृह, मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सखापाटील रुग्णालय, मालवणी सरकारी रुग्णालय, चोक्सी प्रसूतीगृह, आप्पापाडा प्रसूती रुग्णालय, आंबेडकर रुग्णालय, आकुर्ली प्रसूतीगृह, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, शताब्दी रुग्णालय अशा सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*