नवी दिल्ली: ओमिक्रॉन या करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात दहशत पसरली आहे. जगातील अनेक देश सतर्क आहेत. दरम्यान, भारतातही ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारही सतर्क झाले आहेत.कोविड-१९ चा नवीन प्रकार B.1.1529 या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी याचे वर्णन ‘वेरिएंट ऑफ कन्सर्न’ असे केले आहे. त्याला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. हा प्रकार करोनाच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे.