भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई (दादर) येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सुप्रसिद्ध विकासक अक्षय फाटक यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
या प्रवेशानंतर त्यांच्यावर केवळ तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने ‘माय कोकण’नं त्यांची खास मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीमध्ये आम्ही समजून घेतलं आहे की, ते भाजपमध्ये का आले आणि त्यांचं व्हिजन कसं राहणार आहे.
प्रश्न : सर्वात आधी तुमची भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहात, या प्रवेशाला उशीर झालाय का आणि हा निर्णय घेण्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात?
उत्तर : पहिल्यांदा मी ‘माय कोकण’चे आभार मानतो की, आपण सर्वात आधी माझी मुलाखत घेत आहात. आता जो तुम्ही प्रश्न विचारलात की उशीर झाला का? तर कुठच्याही चांगल्या कामाला कधीच उशीर होत नाही, ही माझी शंभर टक्के धारणा आहे. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासकामं असतील किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये आपला पण खारीचा वाटा असलाच पाहिजे असा विचार करून शेवटी मी निर्णय घेतला आहे. मागच्या वेळी जरी मी निवडणूक अपक्ष लढलो असलो तरी पण माझ्या घरामध्ये पहिल्यापासूनच म्हणजे दोन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वातावरण आहे. मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आहे.
याच्यामुळे जर कुठल्याही पक्षातून काम करायचं झालं तर ते अर्थात भाजप असणार यात कुठलीही शंका नव्हती. त्याच्यामुळे उशीर झाला असं मी म्हणणार नाही. एकूणच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे कामं चालू आहेत, भाजपचं आणि एकूणच महायुती सरकार ज्या प्रकारे काम करतंय, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, चांगल्या प्रकारे विकास कसा करता येईल, यासाठी मी स्वतला झोकून घेईन. कायम ग्रासरूटमधून म्हणजे ग्रामविकासातूनच राष्ट्रविकास होत असतो.
तर चांगल्या गोष्टीमध्ये आपला खारीचा वाटा असला पाहिजे, ही माझी भावना आहे. आता मी जालगावचा सरपंच आहे. जर का गावाच्या विकासासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध व्हायला हवा असेल किंवा कुठल्याही प्रकारची चांगली घटना घडायची असेल तर पक्षाचं पाठबळ अत्यंत महत्वाचं असतं. याचाच विचार करून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकांसाठी तर मी भाजपाचाच होतो पण आता मी औपचारिकपणे पक्षामध्ये काम करायला लागलो आहे.
प्रश्न : जेव्हा तुमच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हा दापोलीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या. त्यांची साथ कशी लाभली?
उत्तर : याची सुरूवात अशी झाली की, रत्नागिरी जिल्ह्याचे केदारजी साठे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या जवळ जेव्हा मी दीड महिन्यांपूर्वी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी माझ्या निर्णयाचं अतिशय सकारात्मकतेनं स्वागत केलं. तुझ्या सारखा एखादा चांगला कार्यकर्ता, चांगला माणूस पक्षाला जोडला जात असेल आणि सक्रीय होणार असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये पक्षाचा फायदा आहे. इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती, ज्यांनी दापोली मतदारसंघ दत्तक घेतला आहे, त्यांचंही मला उत्तम मार्गदर्शन लाभलं. त्यामुळेच मी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करू शकलो.
प्रश्न : तुम्हाला पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राज्याच्या युवा कार्यकारिणीमध्ये काम करायला मिळणार आहे. काय प्लानिंग राहणार आहे, कशाप्रकारे तुम्ही वाटचाल करणार आहात?
उत्तर : आता माझ्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचं प्रदेश कार्यकारिणी सदस्यपद आहे. ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर आहेत आणि अजय शिंदे हे तालुकाध्यक्ष आहेत. जिल्हा कार्यकारिणीची ही फळी इथे कार्यरत आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन मंडणगड, गुहागर खेड, चिपळूण अशा सगळ्या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाची ताकद वाढवणं, ही माझी प्रमुख जबाबदारी राहणार आहे. कारण आजचा भाजपा युवा मोर्चा उद्याचा कोअर भाजपा म्हणून काम करणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्याला त्याची ताकद वाढवणं खूप आवश्यक आहे. आता सर्वात तातडीचा जो कार्यक्रम आपण हाती घेत आहोत तो आहे ‘नमो चषक’. आपण सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेणार आहोत. या सर्व स्पर्धा ‘नमो चषकांतर्गत होणार आहेत. त्याच्या आयोजनाची तयारी सध्या सुरू आहे. येत्या 12 ते 27 जानेवारी 2024 दरम्यान या सर्व स्पर्धा होणर आहेत. यामध्ये चांगल्या प्रकारची आकर्षक बक्षिसे असणार आहेत. त्याच्या कामाला आम्ही लागलो आहोत.
प्रश्न : प्रवेशाच्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात तुम्हाला भरतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना भेटला होतात. त्यावेळेला पक्ष प्रवेशा विषयी काही चर्चा झाली होती का?
उत्तर : नाही नाही. मी खूप लहान पातळीवरचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटायला मिळणं हा सुद्धा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. त्यांची आणि माझी भेट अतिशय अनौपचारिक होती. त्या भेटीमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. त्यांचं वागणं, बोलणं आणि सगळं व्यक्तिमत्व अतीशय प्रभावी आहे. पुण्यात माझ्या मित्रांने लिहिलेल्या सावरकरांवरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाला आपण म्हणजेच ‘फाटक डेव्हलपर्स’नं स्पॉन्सर केलं होतं. त्या कार्यक्रमात आमची भेट झाली होती.
प्रश्न : तुमची पुढील वाटचाल कशी राहणार आहे
उत्तर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे युवकांचे जे प्रश्न असतील त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरुणांच्या नोकरीचा विषय असेल किंवा व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न असतील तर मी पुढाकार घेऊन तो विषय मार्गी कसा लागेल यासाठी पाठपुरावा करेन. त्याचबरोबर रोजगार निर्मिती कशी होईल, गाव पातळीवरील युवक मंडळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल याकडे मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे. थोडक्यात काय तर तरुणांच्या विषयावर फोकस करून मी भविष्यात कार्य करणार आहे. भाजयुमोच्या माध्यमातून पक्षाला बळ देण्याचं काम मी सातत्याने करत राहणार आहे.