दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामती, राज्यातील कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते न चुकता येतात. गेल्या वर्षी कोरोनामुळं यात खंड पडला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने यंदा पुन्हा एकदा पवार कुटुंबिय कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा केला.

दिवाळी पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नेमके कुठं आहेत आणि का आले नाहीत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

मात्र खुद्द शरद पवारांनीच अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलं. अजित पवारांच्या घरातील ३ कर्मचारी कोरोना बाधित तर २ ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेली दोन वर्षे सर्वांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही. आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे.

त्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे यंदाची दिवाळी जनतेला साजरी करता येत आहे. पण कोरोना नियमांची तयारी असायला हवी आणि ती दिसते.

आज देखील हा कार्यक्रम शिस्तीने, खबरदारीने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही घेतल्या, असं पवार म्हणाले.