कोरोना ब्रेकनंतर फळांचा राजा निघाला अमेरिका दौर्‍यावर

मुंबई– बाजारपेठेत फळांचा राजा आंबा गत महिन्यातच दाखल झाला आहे. तर त्यापाठोपाठ आता हापूसच्या निर्यातीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून परदेशी खवय्ये गोड, रसाळ आंब्याच्या चवीपासून वंचित होते. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

दोन वर्षांनंतर फळांचा राजा अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहे. निर्यातीसंबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून अमेरिकेतील ग्राहकांना दोन वर्षांनंतर हापूसची चव चाखता येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्यात रोखण्यात आली होती. पण अमेरिकेतील कृषी विभागाने आता आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हापूस आंब्याच्या निर्यातीचा मार्ग खुला झाला असल्याचे आंबा बागायतदार संघाकडून सांगण्यात आले. तर आगामी मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष निर्यातीला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतातील मुख्य बाजारपेठांमध्ये आंब्याला मोठी मागणी असते.

अमेरिकेतील आंबा प्रेमीही दरवर्षी हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या कठोर नियम व निर्बंधांमुळे निर्यात बंदी करण्यात आली होती. अखेर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे तसेच निसर्गाच्या चक्रामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मात्र, यंदा आंब्याची निर्यात करता येणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*