खोके सरकार महाराष्ट्राचे की गुजरातचे? – आदित्य ठाकरे यांचा सवाल
खेड : राज्यातील खोके सरकार हे महाराष्ट्राचे की गुजरातचे आहे, हेच कळेनासे झाले आहे. ज्याप्रमाणे गद्दार सुरत मार्गे गुवहाटी आणि गुजरातला जाऊन आले.
त्याप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला जात आहेत, अशी बोचरी टीका करुन येत्या डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन हे या खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असून ४० गद्दार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असा दावा करत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
खेड तालुक्यातील चिंचघर येथील माजी आमदार संजय कदम यांच्या घरासमोरील खळा बैठकीला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेते व आमदार राजन साळवी, माजी खासदार अनंत गीते, माजी आमदार संजय कदम, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, माजी जि.प.चे अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, शहरप्रमुख दर्शन महाजन, युवासेना शहर अधिकारी प्रसाद पाटणे, राकेश सागवेकर आदींसह शेकडो शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे सभेला संबोधित करताना पुढे म्हणाले, कालपासून कोकणात खळा बैठक घेत आहोत. ही नवी संकल्पना असून शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी बैठका घेत आहे.
या बैठका मोठ्या होऊ शकतात. मात्र परिवारातील चर्चेच्या बैठकीला एवढी गर्दी होत असून, प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही एखाद्या पक्षाची एवढी सभा असते, अशी टीकाही शिंदे गटाच्या दिशेने नाव न घेता केली.
चिपी विमानतळ, वाशिष्ठीचा गाळ काढणे, अनेक मंदिरांना फंड देणे असेल ही कामे थांबली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हे सरकार अपयशी ठरले आहे.
कृषीक्षेत्र तर पूर्ण कोलमडून गेलय. हे संपूर्ण वातावरण बदलायचे असेल तर आगामी निवडणुका आपल्याला जिंकल्याशिवाय पर्याय नाही.
याची सुरुवात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपासून आपल्याला करायची आहे. मागच्यावेळी पदवीधर मतदार संघात आपली तयारी कमी पडली, पण आता संधी आलेली आहे.
त्यामुळे नाव नोंदणीसाठी पदवीधर मतदारांनी ही संधी सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. सरकार चालवताना विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा या सगळीकडे आपली ताकद असायला हवी. तेव्हा आपण आपले निर्णय मंजूर करु शकतो.
विजयासाठी मतदार नाव नोंदणी महत्वाची असून इंडिया आघाडीला मतदार करुन आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित करा.
मुंबई पदवीधर मतदार संघात मतदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करुन गेली अनेक वर्ष वर्चस्व ठेवले आहे.
मुंबई म्हणजे कोकण असून कोकण हे मुंबईशी संलग्न आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघातील विजय करण्यासाठी मतदार नोंदणीचे काम जलदगतीने पूर्ण करा.
त्यासाठी पक्षप्रमुखांनी किशोर जैन यांची नियुक्ती केली असून दररोज ते त्यांना रिपोर्ट करतात. आपला भाग कुठे मागे राहणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादनही आदित्य ठाकरे यांनी बोलताना केले आहे.
चिंचघरच्या सुकन्येचा सत्कार
खेड तालुक्यातील चिंचघरची सुकन्या स्नेहल प्रदीप शिंदे हिने कबड्डी खेळात चमकदार कामगिरी बजावली असल्याने तिचा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पक्षप्रवेश कार्यक्रम
आतिष घाडगे आणि सहकारी यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.