मुंबई-महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा.लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसीवीर, रुग्ण शय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.