रत्नागिरी: रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांना पदोन्नती देत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
त्यांनी रत्नागिरीत पावणेदोन वर्षे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या.
प्रशासकीय गरज आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन, सक्षम प्राधिकाऱ्यांनी बर्गे यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदावर पदोन्नती दिली आहे.
त्यांच्या रिक्त जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बर्गे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये रत्नागिरीत अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
प्रशासनातील त्यांची पकड मजबूत असून, त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
जिंदाल कंपनीतील वायू गळतीनंतर ९० मुलांना त्रास झाला होता, त्यावेळी बर्गे यांनी जिल्हा रुग्णालयात दोन दिवस तळ ठोकून मुलांच्या उपचारांवर लक्ष ठेवले.