गुहागर : कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणारा नेता, कणखर आणि शिस्तप्रिय आमदार भास्कर जाधव यांचे आज एक वेगळेच रूप समोर आले. त्यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाटील या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांचे हळवे हृदय सर्वांसमोर उलगडले.
पांगारी (ता. गुहागर) येथील सडेवाडी येथे झालेल्या या लग्न सोहळ्यात भास्कर जाधव यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला, आणि उपस्थित सर्वांचे मन हेलावून गेले.
सुप्रिया पाटील ही भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून काम करत होती. तिच्या प्रामाणिकपणाने आणि सोज्वळ स्वभावाने जाधव कुटुंबातील प्रत्येकाचे मन जिंकले होते.
जाधव कुटुंबाने तिला कधीच नोकर म्हणून पाहिले नाही, तर तिला मुलीप्रमाणे प्रेम दिले. सुप्रियाचे लग्न ठरल्यानंतर जाधव कुटुंबाने मुलीप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि तिला सन्मानाने तिच्या नव्या आयुष्याच्या वाटेवर पाठवले.
आज सुप्रियाच्या लग्नाचा मुहूर्त होता. भास्कर जाधव यांनी इतर सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून पत्नी सुवर्णा, मुले, सून स्वरा आणि पुतण्यांसह पांगारी येथे हजेरी लावली. लग्नाचे विधी पार पडले, सात फेरे पूर्ण झाले. त्यानंतर जाधव कुटुंब सुप्रियाला भेटायला गेले. सुप्रियाने सुवर्णा आणि स्वराला कडकडून मिठी मारली आणि रडू लागली.
हा क्षण पाहून भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला, आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. उपस्थित सर्वजण या भावनिक क्षणाचे साक्षीदार झाले.
काही वेळाने स्वतःला सावरत भास्कर जाधव यांनी सुप्रियाच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना हृदयस्पर्शी शब्दांत सांगितले, “सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नाही, तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. तुम्हीही तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.” या शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी तरळले.
भास्कर जाधव हे स्वभावाने कडक आणि शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. कोणी चुकीचे वागले, तर ते रोखठोकपणे बोलतात, मग ती व्यक्ती घरातील असो वा बाहेरील.
पण आज त्यांचे हे हळवे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुप्रिया ही त्यांच्या नात्यातील नाही, जातीतीलही नाही, तरीही त्यांनी वडिलांप्रमाणे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक आदर्श निर्माण केला.
हा प्रसंग केवळ एका लग्न सोहळ्यापुरता मर्यादित नाही, तर मानवतेचा आणि माणुसकीचा एक सुंदर संदेश आहे. भास्कर जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की, खरे नेतृत्व केवळ सभागृहातच नव्हे, तर हृदयातही असते.